
प्रतिनिधी(गजानन पाध्ये):-कळमनुरी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. संतोष कल्याणकर यांचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आला आहे. २७ जून रोजी लंडन येथील हाऊस ऑफ लॉर्डस (ब्रिटिश संसद भवन) मध्ये झालेल्या एका विशेष सोहळ्यात डॉ. कल्याणकर यांना “व्हिजनरी लीडर अवॉर्ड” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.लंडन येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स व ऑक्सफर्ड विद्यापीठात २७ व २८ जुन रोजी जागतिक परिषद संपन्न झाली. यावेळी विविध २० देशांतील तज्ञांनी यात सहभाग नोंदविला. हा पुरस्कार लॉर्ड डॅनियल ब्रेनन (संसद सदस्य, ब्रिटन) व कौन्सिलर सुनिल चोपडा (हाऊस ऑफ लॉर्डस कौन्सिल विभाग) यांच्या हस्ते डॉ. कल्याणकर यांना प्रदान करण्यात आला असून या गौरवाने डॉ. कल्याणकर यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली आहे.
यानंतर २८ जून रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठात पार पडलेल्या जागतिक परिषदेतील चर्चासत्रातही डॉ. कल्याणकर यांनी सहभाग घेतला. या दौऱ्यात डॉ. कल्याणकर यांना फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज येथे भेट देण्याची संधीही मिळाली.
डॉ. कल्याणकर हे मागील १५ वर्षांपासून देवर्षी प्रतिष्ठान संचलित कळमनूरी येथील केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवीन दालन खुले केले आहे.
“हा सन्मान माझ्या आई-वडिलांना, पत्नी डॉ. शीतल, मुलगा पियुष, मुलगी दिव्यजा, संपूर्ण कुटुंबाला, केंब्रिज डीकेएम संस्थेला आणि माझ्या मित्रपरिवाराला समर्पित आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
डॉ. कल्याणकर यांच्या या गौरवाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.